Monday, October 27, 2014

दादा कोंडके - "एकटा जीव" (Book review)

पुस्तकाचे मुखपृष्ठ
पुस्तक: "एकटा जीव"         
लेखक: दादा कोंडके  
शब्दांकन: अनिता पाध्ये  
प्रकाशक: अनुबंध प्रकाशन  
ISBN10: 8186144994

सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बर्याचदा आत्मचारीत्र हि दबावाखाली लिहिली जातात म्हणजे ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्या गोष्टींचा विचार करून खूप गोष्टी टाळल्या जातात. ह्यामुळे वास्तवतेच दर्शन ते वाचूनही घडत नाही. चित्रपटातून बेधडक आपले विचार मांडणारया दादा कोंडके यांनीही "एकटा जीव" हे आपल आत्मचरित्र चरित्र लिहील आहे. माझ्या अनुभावावरून मला हे पुस्तक प्रामाणिकपणे लिहील गेल आहे अस वाटत, पण शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय.
           माझ्या लहानपणापासूनच मी दादा कोंडके हे नाव ऐकत आलोय. त्यावेळी माझ्या आजूबाजूचा सर्वच समाज हा त्यांचा चाहता होता. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. मी लहानपणी दूरदर्शनवर लागणारे मराठी सिनेमे झाडून पाहायचो पण दादांचा एकही सिनेमा टीव्हीवर मला पाहायला मिळाला नाही. एवढा मोठा कलाकार की ज्याला शेंबड पोरग सुद्धा नावाने ओळखत त्या माणसाचा चित्रपट टीव्हीवाले का दाखवत नाही हे कोड मला फार उशिरा उलगडल. द्वैअर्थी संवाद हे दादांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य असल्याने टीव्हीवर ते कधी लागलेच नाही. नंतर नंतर कम्पुटर युगात मला मित्रांकडून त्यांचे खूप सिनेमे मिळाले. विशेष म्हणजे आजही मला ते हसवून गेले. द्वैअर्थी संवाद सोडला तर दादा नेहमीच आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देत असत. त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असल्याने मी इंटरनेटवर शोध घेऊ लागलो पण मला काही जास्त माहिती मिळू शकली नाही. दादांच्या जीवनाविषयी मी बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी ऐकून होतो. पण ठोस असं काही वाचण्यात आलं नव्हत. सुरवातीलाच मी  "एकटा जीव" ह्या पुस्तकाबद्दल ऐकल होत पण ते विकत घेतलं नव्हत.
bookganga.com वर एकदा सहजच मी ह्या पुस्तकाची sample pages वाचली आणि मला या पुस्तकाची भुरळ पडली आणि शेवटी विकतच घेतल.
              अनिता पाध्ये यांनी व्यवस्थित
रित्या या पुस्तकाचे शब्दांकन आणि मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचताना दादा आपल्याबरोबर बोलत आहे असा भास होतो. कोणताही पडदा न ठेवता दादांनीही आपले अनुभव येथे मोकळ्या मनाने मांडल्याच जाणवत. दादांच्या पश्चात कसलीही भीती न बाळगता ते पुस्तक प्रकाशित करण हे मोठ धाडसच म्हणावं लागेल, त्यासाठी अनिता पाध्येंच कौतुक कराव तेवढ थोड आहे . दादांच्या लहानपण आणि दादागीरीतल्या दिवसांचे वर्णन वाचताना भविष्यात हा माणूस "सुपरस्टार दादा कोंडके" होईल अस मुळीच वाटत नाही. नंतर त्यांची इच्छाशक्ती आणि परिस्थिती त्यांना ते बनायला कशी भाग पडते हे उत्तरार्धात उमजत. दादांना विनोदी कलाकार म्हणून जगापुढे आणणाऱ्या "विच्छा माझी पुरी करा" चा उदय आणि अस्त पुस्तकात विस्तृतपणे मांडला आहे. त्याच्या प्रयोगादरम्यान होणार्या गमती जमती वाचताना मजा येते. कालांतराने कलाकारांशी होणारे वादविवाद आणि त्याला येणारी अवकळा त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली आहे.
दादा कोंडकेंच्या यशामागे फार मोठा वाटा आहे तो त्यांचे गुरु "बाबा" उर्फ "भालजी पेंढारकर" यांचा. अर्थात चित्रपट सृष्टीत दादांनी पाहिलं पाउल टाकल ते बाबांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातूनच. हे पुस्तक वाचण्यापूर्वी दादा आणि बाबा यांच्या नात्याची
मला सुतराम सुद्धा कल्पना नव्हती.  बाबांनी त्यांना दिलेले सल्ले आणि उपाय खरच विचार करायला लावणारे आहेत. दादांनीही एक खरा शिष्य म्हणून त्यांना वेळोवेळी दिलेली साथही वाचकावर प्रभाव पाडून जाते. दादांचे बरेचसे चित्रपट मी पाहिले असल्याने त्यात त्यांविषयी सांगितलेले किस्से समजायला मला अवघड गेल नाही अन कंटाळवाणही वाटल नाही. त्यांनी खाल्लेल्या नाना खस्ता आणि त्यावर त्यांनी घेतलेले योग्य आणि बेधडक निर्णय खूप काही शिकवून जातात. अर्थातच त्यांनी त्यांच्या चुकाही येथे प्रामाणिकपणे कबुल केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या असलेल्या प्रेम सम्बंधांचीही त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. "विच्छा माझी पुरी करा" मुळे दादांचे सर्वस्तरातील लोकांबरोबर सौख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. बर्याच राजकीय नेत्याच्याही ते संपर्कात आले त्यापैकी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या आयुष्यातील स्थान यात विस्तृतपणे मांडल आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला बरेच धक्के बसतात. मला मोठा धक्का बसला तो त्यांचे मंगेशकर कुटुंबियांचे संबंध वाचताना. मी जास्त काही लिहित नाही पण वाचकाला त्या घराण्याचा एक नवा पैलू या पुस्तकात अनुभवायला मिळेल हे मात्र नक्की. वेळोवेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या जीवनावरही प्रकाश टाकला आहे. त्यांचाशी झालेला रुसवा फुगवा हि त्यांनी सविस्तर पद्धतीने मांडला आहे. व्ही शांताराम यांच्याशी असलेल शीतयुद्ध आणि त्यातून निर्माण झालेले वाद त्यांनी संदर्भासहित मांडले आहेत.
दादांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कलाकाराच्या स्वभावावर बेधडक भाष्य केल आहे पण त्यांनी कोणत्या कलाकाराच्या कलेचा अनादर मात्र कुठेही केलेला नाही हेही तेवढच खर. दादा कोंडकेंनी केलेला राम-लक्ष्मण संगीतकार जोडीचा उदय तर आश्चर्याचा धक्का देऊन जातो. दादांनी सेन्सॉर बोर्डाशी केलेला संघर्ष आणि त्याचा करून घेतलेला उपयोग वाचताना त्यांच्या चातुर्याची दाद द्यावीशी वाटते.
दादांच्या कष्टांमुळे आणि समर्पक वृत्तीमुळे ते खूप यशस्वी झाले पण त्याचं एकटेपण त्यांना आयुष्यभर खुपत राहील. त्यांच्या काही कुटुंबीयांनी दिलेला दगा आणि वागणूक मनात धस्स करून जाते. आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी पेक्षाही बर्याच गोष्टी महत्वाच्या असतात ह्याचा बोध हे पुस्तक वाचल्यावर होतो. आज दादा हयात नसतीलही पण त्यांनी निर्माण केलेली चित्रपट संपदा कितीही लुटली तरी न संपणारी आहे. जोपर्यंत जगात "विनोद" ही गोष्ट टिकून राहील तोपर्यंत "दादा कोंडके" या व्यक्तीला जाणणारी आणि त्यावर प्रेम करणारी माणस न सापडन केवळ अशक्य आहे. 

कृपया आपला अभिप्राय नोंदवा (Please share your comments)

टीप: वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत

1 comment: