मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

चित्रपटाचे पोस्टर
मराठी भाषेत सध्या अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो". सामजिक विषयावर भाष्य करणारे मराठीमध्ये आजवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण हा चित्रपट  त्यापासून निश्चितच वेगळा वाटतो कारण हा एक जीवनपट आहे. विविध प्रसंगांमधून हा चित्रपट समाजसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे या जोडीचा खडतर प्रवास दाखवतो. "मी समाजसेवा करते/करतो" या वाक्याचा उच्चार उच्चभू मंडळी सातत्याने करताना दिसतात. खरतर गरजूंपर्यंत त्यापैकी कितीजण पोचतात हा मोठा प्रश्नच आहे. मात्र याच्या अगदी उलट, काही लोक कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर कुणालातरी जगवण्यासाठी प्रकाशझोतात न येता उभ आयुष्य वेचत असतात. या चित्रपटातील पात्र ह्या दुसर्या प्रकारात मोडतात, त्यामुळे अर्थातच त्याचं कार्य प्रकाशझोतात नसल्याने पडद्यावर पाहताना आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के बसतात 
बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याचं समीक्षण माझ्या अनुभवला तंतोतंत लागु पडेल अस मुळीच नाही. चित्रपट हा प्रकारच मुळात मर्यादित असल्याने एखाद्याच्या जीवनातील सर्वच्या सर्व प्रसंग दाखवण कदापि शक्य होत नाही. त्यामुळे कलाटणी देणारे आणि कार्याचा अंदाज येईल असे प्रसंग यामध्ये समाविष्ठ करण क्रमप्राप्त असत. या चित्रपटात सादर केलेला प्रत्येक प्रसंग काही ना काही सांगून नक्कीच जातो त्यामुळे प्रेक्षकाची त्याच्याशी नाळ जुळण स्वाभाविक आहे. 
डॉ. प्रकाश आमटे आपल्या पत्नी सोबत
बर्याचदा समीक्षक चित्रपट संथ आहे कि वेगवान आहे कि खुर्चीला खिळवणारा हे सांगत असतात. पण मुळातच ह्या चित्रपटाला येणारा प्रेक्षकच हा केवळ आणि केवळ जीवनप्रवास पाहायला आलेला असल्याने या बाबींकडे तो साफ दुर्लक्ष करतो. ह्यामध्ये दाखवलेला आदिवासी समाज आणि त्याचं जीवन सार थक्क करणार वाटत. ते सर्व जण अभिनय करत आहेत हेच मुळात आपल्याला पटत नाही.  सर्वप्रथम मी निर्माता आणि दिग्दर्शक याचं कौतक करील कारण त्यांनी अशा सामाजिक पटासाठी सामजिक कार्याची रुची असलेले आणि प्रेक्षकांना ज्यांचा अभिनय पडद्यावर पाहायला आवडतो असे नायक आणि नायिका यासाठी निवडले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय तर थक्क करून सोडणारा आहे. नाना पाटेकर हा आपल्याला नाना पाटेकर न वाटता प्रकाश आमटेच वाटतो कारण विविध चित्रपटांतून कायमच असामाजीक गोष्टींवर तावातावाने चालून जाणारा नाना इथे मात्र शांत, हळवा आणि कार्यकेन्द्री वाटतो. नाना हा पहिल्यापासूनच आमटे कुटुंबातीलच जणू एक सदस्य असल्याने त्याला हे जगण पाहण काही नवीन नव्हत पण सोनाली कुलकर्णी हि कसा अभिनय करते हे पाहण औत्सुक्याच होत. नानांसारखा कसदार अभिनेता समोर असताना आपली वेगळी छाप पाडण हे सोप काम नसत मात्र तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पडद्यावर आपल वेगळ स्थान निर्माण केलय.
अजून एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो कि चित्रपट ह्या दोन व्यक्तिरेखेवर केंद्रित न राहता त्यांच्या जोडीदारांनी केलेल्या त्यागाचही योग्य चित्रण करतो, त्यामुळे त्यात वास्तवता उतरली आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या आदिवासी भागात एक दवाखाना सुरु करण्यामागची धडपड पाहताना "खरखुर" समाजकार्य किती कठीण आहे याची जाणीव प्रेक्षकाला नक्कीच होते. सवांद लेखन हे उत्तम झाल्याने परिस्थितीच गांभीर्य टिकून राहील आहे. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमातील संवाद आणि नक्षलवाद सोडून शिकून मोठा झालेल्या आदिवासी मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी आल नाही तरच नवल.
गुरु ठाकूर ने लिहिलेली "तू बुद्धी दे" हि प्रार्थना चित्रपटामध्ये मधून मधून ऐकायला मिळते. हे ऐकल्यावर उंबरठा या चित्रपटातील "गगन सदन तेजोमय" ह्या लता दीदींच्या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गुरु ठाकूर हा मुळातच कसलेला लेखक असल्याने त्याचे शब्द जादू करून जातात. हि प्रार्थना इतकी अर्थपूर्ण आहे कि काही दिवसांनी हि एखाद्या शाळेत गायली गेली तर मुळीच आश्चर्य वाटायला नको.
चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळते कि चित्रपटाच्या नावात डॉ. प्रकाश बाबा आमटे ह्यापुढे "द रियल हिरो" का जोडलं आहे.  सामाजिक कार्य हे कस असाव हे समाजाला सांगण्यात हा चित्रपट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. अथांग सागराकडे पाहून जसे गर्वहरण व्हावे तशी स्थिती हा चित्रपट पाहिल्यावर अनेक जणांची होते.
मला खात्री आहे कि हा चित्रपट पाहिल्यावर बरेच लोक हेमलकसाला भेट देतील आणि समाजकार्यात खारीचा का होईना वाटा उचलतील. असे चित्रपट बनवताना खूप धाडस लागत त्यामुळे संपूर्ण टीमचे कौतुक कराव तेवढ थोडच आहे. गल्ला जमवण्यात नाही पण एखाद जीवन जरी बदलयला हा चित्रपट यशस्वी झाला तर, ह्या चित्रपटला श्रेष्ठत्व सांगणार्या कसल्याही पुरस्कराची गरज भासणार नाही.

कृपया आपला अभिप्राय नोंदवा (Please share your comments)

टीप: वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत

Comments

Popular posts from this blog

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"घेई छंद" पुस्तकानुभव