मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)
चित्रपटाचे पोस्टर |
बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याचं समीक्षण माझ्या अनुभवला तंतोतंत लागु पडेल अस मुळीच नाही. चित्रपट हा प्रकारच मुळात मर्यादित असल्याने एखाद्याच्या जीवनातील सर्वच्या सर्व प्रसंग दाखवण कदापि शक्य होत नाही. त्यामुळे कलाटणी देणारे आणि कार्याचा अंदाज येईल असे प्रसंग यामध्ये समाविष्ठ करण क्रमप्राप्त असत. या चित्रपटात सादर केलेला प्रत्येक प्रसंग काही ना काही सांगून नक्कीच जातो त्यामुळे प्रेक्षकाची त्याच्याशी नाळ जुळण स्वाभाविक आहे.
डॉ. प्रकाश आमटे आपल्या पत्नी सोबत |
अजून एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो कि चित्रपट ह्या दोन व्यक्तिरेखेवर केंद्रित न राहता त्यांच्या जोडीदारांनी केलेल्या त्यागाचही योग्य चित्रण करतो, त्यामुळे त्यात वास्तवता उतरली आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या आदिवासी भागात एक दवाखाना सुरु करण्यामागची धडपड पाहताना "खरखुर" समाजकार्य किती कठीण आहे याची जाणीव प्रेक्षकाला नक्कीच होते. सवांद लेखन हे उत्तम झाल्याने परिस्थितीच गांभीर्य टिकून राहील आहे. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमातील संवाद आणि नक्षलवाद सोडून शिकून मोठा झालेल्या आदिवासी मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी आल नाही तरच नवल.
चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळते कि चित्रपटाच्या नावात डॉ. प्रकाश बाबा आमटे ह्यापुढे "द रियल हिरो" का जोडलं आहे. सामाजिक कार्य हे कस असाव हे समाजाला सांगण्यात हा चित्रपट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. अथांग सागराकडे पाहून जसे गर्वहरण व्हावे तशी स्थिती हा चित्रपट पाहिल्यावर अनेक जणांची होते.
मला खात्री आहे कि हा चित्रपट पाहिल्यावर बरेच लोक हेमलकसाला भेट देतील आणि समाजकार्यात खारीचा का होईना वाटा उचलतील. असे चित्रपट बनवताना खूप धाडस लागत त्यामुळे संपूर्ण टीमचे कौतुक कराव तेवढ थोडच आहे. गल्ला जमवण्यात नाही पण एखाद जीवन जरी बदलयला हा चित्रपट यशस्वी झाला तर, ह्या चित्रपटला श्रेष्ठत्व सांगणार्या कसल्याही पुरस्कराची गरज भासणार नाही.
कृपया आपला अभिप्राय नोंदवा (Please share your comments)
टीप: वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत
Comments