Monday, October 27, 2014

दादा कोंडके - "एकटा जीव" (Book review)

पुस्तकाचे मुखपृष्ठ
पुस्तक: "एकटा जीव"         
लेखक: दादा कोंडके  
शब्दांकन: अनिता पाध्ये  
प्रकाशक: अनुबंध प्रकाशन  
ISBN10: 8186144994

सिनेकलाकारांची दुनिया आपल्याला कायमच रंगीबेरंगी वाटत आली आहे. त्यांचा थाटमाट आणि त्यांना मिळणारा मान सन्मान पाहून आपल्याला त्यांच्या जगण्याचा हेवा वाटत नसेल तरच नवल. प्रसारमाध्यम सोडली तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्याची फारशी संधी आपल्याला मिळत नाही. प्रसारमाध्यमही त्यांना सोयीस्कर अशाच बातम्या आपल्याला पुरवत असतात त्यामुळे त्यांच्या विश्वासहर्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. मग पडद्यामागील गोष्टी समजून घेण्यासाठी दोनच पर्याय उपलब्ध असतात एक म्हणजे त्या कलाकाराशी केलेली प्रत्यक्ष बातचीत किंवा त्याने प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मचरित्र. पहिला पर्याय स्वीकारणं सर्वांना शक्य होतच असं नाही, पण दुसरा पर्याय हा सर्वांना स्वीकाराण्याजोगा आहे आणि ह्या दुसर्या पर्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिणारी व्यक्ती हयात असो वा नसो आपल्याला तिच्या अनुभवाची शिदोरी मिळायला अडचण येत नाही. बर्याचदा आत्मचारीत्र हि दबावाखाली लिहिली जातात म्हणजे ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्या गोष्टींचा विचार करून खूप गोष्टी टाळल्या जातात. ह्यामुळे वास्तवतेच दर्शन ते वाचूनही घडत नाही. चित्रपटातून बेधडक आपले विचार मांडणारया दादा कोंडके यांनीही "एकटा जीव" हे आपल आत्मचरित्र चरित्र लिहील आहे. माझ्या अनुभावावरून मला हे पुस्तक प्रामाणिकपणे लिहील गेल आहे अस वाटत, पण शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय.
           माझ्या लहानपणापासूनच मी दादा कोंडके हे नाव ऐकत आलोय. त्यावेळी माझ्या आजूबाजूचा सर्वच समाज हा त्यांचा चाहता होता. दादांचे बरेचसे चित्रपट हे ग्रामीण जीवनावर बेतलेले असल्याने खेड्यापाड्यापर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. मी लहानपणी दूरदर्शनवर लागणारे मराठी सिनेमे झाडून पाहायचो पण दादांचा एकही सिनेमा टीव्हीवर मला पाहायला मिळाला नाही. एवढा मोठा कलाकार की ज्याला शेंबड पोरग सुद्धा नावाने ओळखत त्या माणसाचा चित्रपट टीव्हीवाले का दाखवत नाही हे कोड मला फार उशिरा उलगडल. द्वैअर्थी संवाद हे दादांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य असल्याने टीव्हीवर ते कधी लागलेच नाही. नंतर नंतर कम्पुटर युगात मला मित्रांकडून त्यांचे खूप सिनेमे मिळाले. विशेष म्हणजे आजही मला ते हसवून गेले. द्वैअर्थी संवाद सोडला तर दादा नेहमीच आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश देत असत. त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असल्याने मी इंटरनेटवर शोध घेऊ लागलो पण मला काही जास्त माहिती मिळू शकली नाही. दादांच्या जीवनाविषयी मी बर्याच चांगल्या-वाईट गोष्टी ऐकून होतो. पण ठोस असं काही वाचण्यात आलं नव्हत. सुरवातीलाच मी  "एकटा जीव" ह्या पुस्तकाबद्दल ऐकल होत पण ते विकत घेतलं नव्हत.
bookganga.com वर एकदा सहजच मी ह्या पुस्तकाची sample pages वाचली आणि मला या पुस्तकाची भुरळ पडली आणि शेवटी विकतच घेतल.
              अनिता पाध्ये यांनी व्यवस्थित
रित्या या पुस्तकाचे शब्दांकन आणि मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचताना दादा आपल्याबरोबर बोलत आहे असा भास होतो. कोणताही पडदा न ठेवता दादांनीही आपले अनुभव येथे मोकळ्या मनाने मांडल्याच जाणवत. दादांच्या पश्चात कसलीही भीती न बाळगता ते पुस्तक प्रकाशित करण हे मोठ धाडसच म्हणावं लागेल, त्यासाठी अनिता पाध्येंच कौतुक कराव तेवढ थोड आहे . दादांच्या लहानपण आणि दादागीरीतल्या दिवसांचे वर्णन वाचताना भविष्यात हा माणूस "सुपरस्टार दादा कोंडके" होईल अस मुळीच वाटत नाही. नंतर त्यांची इच्छाशक्ती आणि परिस्थिती त्यांना ते बनायला कशी भाग पडते हे उत्तरार्धात उमजत. दादांना विनोदी कलाकार म्हणून जगापुढे आणणाऱ्या "विच्छा माझी पुरी करा" चा उदय आणि अस्त पुस्तकात विस्तृतपणे मांडला आहे. त्याच्या प्रयोगादरम्यान होणार्या गमती जमती वाचताना मजा येते. कालांतराने कलाकारांशी होणारे वादविवाद आणि त्याला येणारी अवकळा त्यांनी स्पष्ट शब्दात मांडली आहे.
दादा कोंडकेंच्या यशामागे फार मोठा वाटा आहे तो त्यांचे गुरु "बाबा" उर्फ "भालजी पेंढारकर" यांचा. अर्थात चित्रपट सृष्टीत दादांनी पाहिलं पाउल टाकल ते बाबांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातूनच. हे पुस्तक वाचण्यापूर्वी दादा आणि बाबा यांच्या नात्याची
मला सुतराम सुद्धा कल्पना नव्हती.  बाबांनी त्यांना दिलेले सल्ले आणि उपाय खरच विचार करायला लावणारे आहेत. दादांनीही एक खरा शिष्य म्हणून त्यांना वेळोवेळी दिलेली साथही वाचकावर प्रभाव पाडून जाते. दादांचे बरेचसे चित्रपट मी पाहिले असल्याने त्यात त्यांविषयी सांगितलेले किस्से समजायला मला अवघड गेल नाही अन कंटाळवाणही वाटल नाही. त्यांनी खाल्लेल्या नाना खस्ता आणि त्यावर त्यांनी घेतलेले योग्य आणि बेधडक निर्णय खूप काही शिकवून जातात. अर्थातच त्यांनी त्यांच्या चुकाही येथे प्रामाणिकपणे कबुल केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या असलेल्या प्रेम सम्बंधांचीही त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. "विच्छा माझी पुरी करा" मुळे दादांचे सर्वस्तरातील लोकांबरोबर सौख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. बर्याच राजकीय नेत्याच्याही ते संपर्कात आले त्यापैकी बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या आयुष्यातील स्थान यात विस्तृतपणे मांडल आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला बरेच धक्के बसतात. मला मोठा धक्का बसला तो त्यांचे मंगेशकर कुटुंबियांचे संबंध वाचताना. मी जास्त काही लिहित नाही पण वाचकाला त्या घराण्याचा एक नवा पैलू या पुस्तकात अनुभवायला मिळेल हे मात्र नक्की. वेळोवेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील प्रमुख पात्रांच्या जीवनावरही प्रकाश टाकला आहे. त्यांचाशी झालेला रुसवा फुगवा हि त्यांनी सविस्तर पद्धतीने मांडला आहे. व्ही शांताराम यांच्याशी असलेल शीतयुद्ध आणि त्यातून निर्माण झालेले वाद त्यांनी संदर्भासहित मांडले आहेत.
दादांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या कलाकाराच्या स्वभावावर बेधडक भाष्य केल आहे पण त्यांनी कोणत्या कलाकाराच्या कलेचा अनादर मात्र कुठेही केलेला नाही हेही तेवढच खर. दादा कोंडकेंनी केलेला राम-लक्ष्मण संगीतकार जोडीचा उदय तर आश्चर्याचा धक्का देऊन जातो. दादांनी सेन्सॉर बोर्डाशी केलेला संघर्ष आणि त्याचा करून घेतलेला उपयोग वाचताना त्यांच्या चातुर्याची दाद द्यावीशी वाटते.
दादांच्या कष्टांमुळे आणि समर्पक वृत्तीमुळे ते खूप यशस्वी झाले पण त्याचं एकटेपण त्यांना आयुष्यभर खुपत राहील. त्यांच्या काही कुटुंबीयांनी दिलेला दगा आणि वागणूक मनात धस्स करून जाते. आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी पेक्षाही बर्याच गोष्टी महत्वाच्या असतात ह्याचा बोध हे पुस्तक वाचल्यावर होतो. आज दादा हयात नसतीलही पण त्यांनी निर्माण केलेली चित्रपट संपदा कितीही लुटली तरी न संपणारी आहे. जोपर्यंत जगात "विनोद" ही गोष्ट टिकून राहील तोपर्यंत "दादा कोंडके" या व्यक्तीला जाणणारी आणि त्यावर प्रेम करणारी माणस न सापडन केवळ अशक्य आहे. 

कृपया आपला अभिप्राय नोंदवा (Please share your comments)

टीप: वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत

Friday, October 17, 2014

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

चित्रपटाचे पोस्टर
मराठी भाषेत सध्या अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे "डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो". सामजिक विषयावर भाष्य करणारे मराठीमध्ये आजवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण हा चित्रपट  त्यापासून निश्चितच वेगळा वाटतो कारण हा एक जीवनपट आहे. विविध प्रसंगांमधून हा चित्रपट समाजसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे या जोडीचा खडतर प्रवास दाखवतो. "मी समाजसेवा करते/करतो" या वाक्याचा उच्चार उच्चभू मंडळी सातत्याने करताना दिसतात. खरतर गरजूंपर्यंत त्यापैकी कितीजण पोचतात हा मोठा प्रश्नच आहे. मात्र याच्या अगदी उलट, काही लोक कुणाला दाखवण्यासाठी नव्हे तर कुणालातरी जगवण्यासाठी प्रकाशझोतात न येता उभ आयुष्य वेचत असतात. या चित्रपटातील पात्र ह्या दुसर्या प्रकारात मोडतात, त्यामुळे अर्थातच त्याचं कार्य प्रकाशझोतात नसल्याने पडद्यावर पाहताना आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के बसतात 
बर्याच समीक्षकांनी हा प्रवास "सिनेमा" म्हणून कसा आहे हे अभ्यासपूर्णरित्या मांडलं आहे. पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून त्याचं समीक्षण माझ्या अनुभवला तंतोतंत लागु पडेल अस मुळीच नाही. चित्रपट हा प्रकारच मुळात मर्यादित असल्याने एखाद्याच्या जीवनातील सर्वच्या सर्व प्रसंग दाखवण कदापि शक्य होत नाही. त्यामुळे कलाटणी देणारे आणि कार्याचा अंदाज येईल असे प्रसंग यामध्ये समाविष्ठ करण क्रमप्राप्त असत. या चित्रपटात सादर केलेला प्रत्येक प्रसंग काही ना काही सांगून नक्कीच जातो त्यामुळे प्रेक्षकाची त्याच्याशी नाळ जुळण स्वाभाविक आहे. 
डॉ. प्रकाश आमटे आपल्या पत्नी सोबत
बर्याचदा समीक्षक चित्रपट संथ आहे कि वेगवान आहे कि खुर्चीला खिळवणारा हे सांगत असतात. पण मुळातच ह्या चित्रपटाला येणारा प्रेक्षकच हा केवळ आणि केवळ जीवनप्रवास पाहायला आलेला असल्याने या बाबींकडे तो साफ दुर्लक्ष करतो. ह्यामध्ये दाखवलेला आदिवासी समाज आणि त्याचं जीवन सार थक्क करणार वाटत. ते सर्व जण अभिनय करत आहेत हेच मुळात आपल्याला पटत नाही.  सर्वप्रथम मी निर्माता आणि दिग्दर्शक याचं कौतक करील कारण त्यांनी अशा सामाजिक पटासाठी सामजिक कार्याची रुची असलेले आणि प्रेक्षकांना ज्यांचा अभिनय पडद्यावर पाहायला आवडतो असे नायक आणि नायिका यासाठी निवडले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय तर थक्क करून सोडणारा आहे. नाना पाटेकर हा आपल्याला नाना पाटेकर न वाटता प्रकाश आमटेच वाटतो कारण विविध चित्रपटांतून कायमच असामाजीक गोष्टींवर तावातावाने चालून जाणारा नाना इथे मात्र शांत, हळवा आणि कार्यकेन्द्री वाटतो. नाना हा पहिल्यापासूनच आमटे कुटुंबातीलच जणू एक सदस्य असल्याने त्याला हे जगण पाहण काही नवीन नव्हत पण सोनाली कुलकर्णी हि कसा अभिनय करते हे पाहण औत्सुक्याच होत. नानांसारखा कसदार अभिनेता समोर असताना आपली वेगळी छाप पाडण हे सोप काम नसत मात्र तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पडद्यावर आपल वेगळ स्थान निर्माण केलय.
अजून एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो कि चित्रपट ह्या दोन व्यक्तिरेखेवर केंद्रित न राहता त्यांच्या जोडीदारांनी केलेल्या त्यागाचही योग्य चित्रण करतो, त्यामुळे त्यात वास्तवता उतरली आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या आदिवासी भागात एक दवाखाना सुरु करण्यामागची धडपड पाहताना "खरखुर" समाजकार्य किती कठीण आहे याची जाणीव प्रेक्षकाला नक्कीच होते. सवांद लेखन हे उत्तम झाल्याने परिस्थितीच गांभीर्य टिकून राहील आहे. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमातील संवाद आणि नक्षलवाद सोडून शिकून मोठा झालेल्या आदिवासी मुलाच्या भेटीचा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी आल नाही तरच नवल.
गुरु ठाकूर ने लिहिलेली "तू बुद्धी दे" हि प्रार्थना चित्रपटामध्ये मधून मधून ऐकायला मिळते. हे ऐकल्यावर उंबरठा या चित्रपटातील "गगन सदन तेजोमय" ह्या लता दीदींच्या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गुरु ठाकूर हा मुळातच कसलेला लेखक असल्याने त्याचे शब्द जादू करून जातात. हि प्रार्थना इतकी अर्थपूर्ण आहे कि काही दिवसांनी हि एखाद्या शाळेत गायली गेली तर मुळीच आश्चर्य वाटायला नको.
चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळते कि चित्रपटाच्या नावात डॉ. प्रकाश बाबा आमटे ह्यापुढे "द रियल हिरो" का जोडलं आहे.  सामाजिक कार्य हे कस असाव हे समाजाला सांगण्यात हा चित्रपट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. अथांग सागराकडे पाहून जसे गर्वहरण व्हावे तशी स्थिती हा चित्रपट पाहिल्यावर अनेक जणांची होते.
मला खात्री आहे कि हा चित्रपट पाहिल्यावर बरेच लोक हेमलकसाला भेट देतील आणि समाजकार्यात खारीचा का होईना वाटा उचलतील. असे चित्रपट बनवताना खूप धाडस लागत त्यामुळे संपूर्ण टीमचे कौतुक कराव तेवढ थोडच आहे. गल्ला जमवण्यात नाही पण एखाद जीवन जरी बदलयला हा चित्रपट यशस्वी झाला तर, ह्या चित्रपटला श्रेष्ठत्व सांगणार्या कसल्याही पुरस्कराची गरज भासणार नाही.

कृपया आपला अभिप्राय नोंदवा (Please share your comments)

टीप: वरील सर्व विचार हे माझे वैयक्तिक आहेत

कॅमेऱ्यात साठवलेला सह्याद्री

नमस्कार मंडळी,
                   महाराष्ट्राला कवी लोकांनी कायमच भरपूर उपाध्या देऊन गौरवलेल आहे. महाराष्ट्राची वन्यसंपत्ती किती मोठी आहे ह्या बद्दल आपण वाचलही असेल पण ती जर बसल्याजागी पाहता आली  तर????? …मोठी पर्वणीच ठरेल ती. 
                   हे स्वप्न सत्यात उतरवलय किरण घाडगे यांनी. त्यांनी खूप मेहनतीन ही संपत्ती आपल्यासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. तर हि संधी दवडू नका आणि त्याचं कौतुक करायला सुद्धा विसरू नका.
                  हि संपत्ती याची देही याची डोळा पाहण्यासाठी येथे click करा. मला खात्री आहे हे पाहून तुम्हाचा महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान कैक पटीन वाढेल. आनंद घ्या आणि share करून इतरांनाही तो घेण्याची संधी द्या . धन्यवाद!

मराठी प्रेमींनो : हि सुवर्णसंधी दवडू नका

 

नमस्कार मंडळी,
                      महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या गीतांचा महाखजिना आता लवकरच MP3 गाणी स्वरुपात DVD/CD वर उपलब्ध होत आहे.यात गदिमांच्या ७०० मूळ MP3 गाण्यांचा (ध्वनी स्वरुपात) समावेश आहे.

DVD Version आपल्या संगणकावर तसेच DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल डिव्हीडी प्लेयरवर चालेल,CD Version आपल्या संगणकावर तसेच CD-MP3/DVD-MP3 सपोर्ट असलेल्या पोर्टेबल सीडी/डिव्हीडी प्लेयरवर चालेल,याशिवाय आपण ही गाणी MP3 प्लेयर असलेल्या आपल्या स्मार्ट फोन व टॅबलेटवरुन सुद्धा ऐकू शकाल. ७०० MP3 गाण्यात गदिमा साईटवर असलेल्या जवळजवळ सर्व गीतांचा समावेश आहे.

७०० MP3 गाण्यात समावेश : मराठी गाणी,चित्रपटगीते,बालगीते,भक्तिगीते,लावण्या,भावगीते,देशभक्तिर गीते
 गीतरामायण,गीतगोपाल,साई दरबार,जोगिया,चैतन्य गौरव,गंगाकाठी,गदिमांचे भाषण,गदिमांच्या आवाजात कविता
एक तासाचा गदिमा लघुपट


डिव्हीडी/सीडी ची डिलिव्हरी १६ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु होत आहे,प्रि.ऑर्डर करणार्‍यांसाठी घटस्थापने पासून गदिमांच्या ९५व्या जयंती निमित्त ही MP3 डिव्हीडी/सीडी विशेष मेगा सवलतीत (४०% पर्यंत सूट) उपलब्ध होत आहे,आजच सवलतीचा लाभ घ्या,ही सवलत केवळ
३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंतच उपलब्ध आहे.

MP3 संग्रहाबद्दल माहिती : http://www.gadima.com/gadima_mp3/index.php
गदिमा मेगा MP3 गीत संग्रह सूची | Full Song List : http://www.gadima.com/gadima_mp3/song_list.phpटीप: खालील संदेश मला इमेल मार्फत www.gadima.com कडून आलाय 


महाकवी ग.दि.माडगूळकरांच्या गीतांचा महाखजिना आता लवकरच MP3 गाणी स्वरुपात DVD/CD वर उपलब्ध होत आहे.यात गदिमांच्या ७०० मूळ MP3 गाण्यांचा (ध्वनी स्वरुपात) समावेश आहे.

आपले,
गदिमा.कॉम
http://www.gadima.com

नमस्कार

नमस्कार मंडळी,
                   मला आवडलेलं, जाणवलेल आणि मी अनुभवलेलं सार काही मी इथे लिहिलं आहे. धन्यवाद!
आपला नम्र,