"घेई छंद" पुस्तकानुभव

लेखक: सुबोध भावे
प्रकाशक: रसिक आन्तरभारती


अगदी लहानपणापासून चित्रपट हे मनोरंजनच माध्यम म्हणून समोर असल्याने अर्थातच जवळजवळ सर्वांनाच चित्रपट क्षेत्र आणि त्याची निर्मिती ह्याबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. बऱ्याच वेळा याच उत्सुकतेपोटी आपण एखादं चित्रपट विषयक मासिक किंवा लेख किंवा मुलाखती वाचत किंवा ऐकत असतो. पण ह्या गोष्टी सांगताना खूपदा वास्तव बाजूला सारून ती माहिती खपण्यासाठी मसालेदार पद्धतीने मांडली जाते आणि मग सत्य हरवून बसत. हे टाळण्यासाठी एकतर चित्रपट सृष्टीतील एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा चरित्रवर्णन वाचणं हा सोपा मार्ग आहे. हे लक्षात घेऊन मी मागे "एकटा जीव" हे पुस्तक वाचलं आणि मला ते आवडलही. परंतु एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती किंवा त्याची जन्मकथा सांगणार पुस्तक मात्र मला सापडलं नव्हतं. असंच एकदा ट्विटरवर सुबोध भावेचं एक ट्विट दिसलं आणि मी अधीर झालो. त्याने त्यात त्याच्या पहिल्या वाहिल्या पुस्तकाबद्दल सांगितलं होत आणि ते पुस्तक त्याच्या १ नाटक आणि ३ चित्रपटांच्या निर्मितिप्रवासाबद्दल होत. मी लागलीच फोन करून एक प्रत बुक केली. 

अर्थातच त्याने ह्या पुस्तकासाठी जे चित्रपट निवडले होते ते उत्कृष्ट होतेच आणि विशेष म्हणजे मी ते तीनही सिनेमागृहात पहिले होते. परंतु त्यातील नाटक मात्र मी पहिलेले नाही. त्या नाटकाचाच पुढे चित्रपट झाल्याने त्याचे संदर्भ समजून घेणं मात्र अवघड गेलं नाही. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाबरोबर तीनही चित्रपटांची DVD सुद्धा भेट म्हणून मिळाली. वाचकांसाठी हा एवढा केलेला विचार मला महत्वाचा वाटला. ह्यातील तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं असल्याने त्याबद्दल वाचताना अजिबात मरगळ येत नाही. आवश्यक तिथे काही वैयक्तिक गोष्टींचा टाळलेला उल्लेख पुस्तकाला मूळ विषयापासून दूर नेत नाही हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य. जरी पुस्तक चार भागात विखुरलं असलं तरी त्यामधे सलगपणा आहे. केवळ ह्या चित्रपटाबद्दल न लिहिता ते करताना त्यानी शिकलेल्या गोष्टी आणि केलेल्या चुका इथे प्रामाणिकपणे नमूद केल्या आहेत. या पुस्तकात खूप नवनव्या गोष्टी वाचायला मिळतील जसे कि कमल हसन यांची मराठी चित्रपटात हुकलेली संधी, राष्ट्रीय पुरस्कार विजेतं अरुणी किरणी गाणं आणि कार यांचा संबंध, आनंद भाटे आणि महेश काळे यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवेश, बालगंधर्वांच्या वंशजांच्या भेटीचा प्रसंग, नाटक बसवताना केलेली कसरत, लोकमान्य करताना भूमिका सापडण्यासाठीची धडपड आणि खूप काही. परंतु या सर्वांबरोबरच यात उल्लेखलेला लेखकाचा "सिटी प्राईड" या सिनेमागृहातील अनुभव खूप काही शिकवून जातो.

बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो कि अमुक अमुक अभिनेता ह्या प्रसिद्ध चित्रपटात होता पण यानंतर परत फार काही चित्रपटात का दिसला नाही किंवा त्याला कुणी परत संधी का दिली नाही. हे पुस्तक वाचल्यावर कळतं कि या क्षेत्रात यश मिळवण्यापेक्षा सतत काही ना काहीतरी करत आपलं अस्तित्व टिकवणं किती महत्वाचं आणि अवघड आहे.  रोज मुंबईमध्ये सिनेमात काम करण्याच्या ओढीने येणारे लोंढेच्या लोंढे कालांतराने गर्दीचा भाग होऊन जातात कारण, जे पाहिजे ते मिळवण्यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी नसते. ज्यांना चित्रपटक्षेत्र म्हणजे केवळ जादुई दुनिया आहे असं वाटत त्यांना हे पुस्तक वाचल्यावर चित्रपट क्षेत्र हे कुरुक्षेत्रापेक्षा काही वेगळं नाही याची जाणीव नक्कीच होईल. चित्रपटाच्या निर्मितिप्रवासाबद्दल लिहिता लिहिता लेखकाने हे चित्रपटविश्व किती आव्हानात्मक आणि रंजक आहे ह्याची एक झलक ह्या पुस्तकात दिली आहे.
एकीकडे मराठी चित्रपट गगनभरारी घेत असताना तो कसा आणि कुणीकुणी घडवला हे सांगणही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. यासर्वांसाठी पुस्तकासारखं अंतर्मुख करणार आणि कालातीत माध्यम नाही. आशा करतो "हा छंद" चित्रपटसृष्टीतील अनेकांना जडो!
                                                                             ---- शैनाथ कळमकर
(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

Comments

पुस्तक वाचायची उत्सुकता अजुन वाढ़ली आहे...छान अभिप्राय...अशीच नवनविन पुस्तके वाचुन अभिप्राय कळवत जावे
खूप खूप धन्यवाद! नक्कीच प्रयत्न करील मी :)

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव