असा चित्रपट जो मला आवडत नाही पण जवळजवळ प्रत्येकाला आवडतो

 3 idiots

हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय असल्याने थोडं आश्चर्य वाटू शकत. मला हा चित्रपट आवडत नसला तरी तो अतिशय टुकार आणि टाकाऊ आहे असेही वाटत नाही. काही स्पष्टीकरण देण्याआधी मी अनुभवलेला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो.


 

मी NITK मध्ये M. Tech करत असताना दुसऱ्या वर्षाला एका नावाजलेल्या प्राध्यापकांबरोबर प्रोजेक्टच काम करत होतो. ते प्राध्यापक कडक शिस्तीचे पण शांत आणि मृदू स्वभावाचे होते. दुसऱ्या वर्षी केवळ प्रोजेक्ट आणि प्रबंध यांचं काम असल्यामुळे आम्ही पूर्णवेळ लॅब मध्ये काम करत असू. हेच प्राध्यापक बॅचलर्सच्या मुलांनाही शिकवत असत आणि विशेष म्हणजे त्यावर्षी एका संपूर्ण बॅचचे पालकत्व त्यांना दिल गेलं होत. पालकत्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एका प्राध्यापकाची नेमणूक दरवर्षी होत असते आणि संस्थाही त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असते.

एकेदिवशी लॅबमध्ये काम करत असताना एक पालक आमच्याकडे प्राध्यापकांविषयी चौकशी करू लागले. ते हिंदीत बोलत असल्याने बाकीच्यांनी मला पुढं केलं कारण त्यांना एकतर त्यांची मातृभाषा किंवा इंग्रजी कळायचं. मग मी त्यांना एका खोलीपर्यंत घेऊन गेलो जिथे प्राध्यापक एका पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी त्याच्या कामाबद्दल चर्चा करत होते. त्यांना सोडून मी परत लॅब मध्ये आलो असता तेच पालक दोन मिनिटात पुन्हा तिथे आले. लॅब मधल्या खुर्चीवर बसता बसता ते म्हणाले प्राध्यापकाने मला इथे थोडा वेळ थांबायला लावले आहे. ते आता फारच विचारग्रस्त दिसत होते, मला लक्षात आलं कि बहुतेक यांच्या मुलासंबंधित काहीतरी कळवण्यासाठी त्यांना बोलावलेलं असावं. न राहवून ते माझ्याशी बोलायला लागले. तो संवाद खालील प्रमाणे

पालक: हे प्राध्यापक आता किती वेळात येणार काही कल्पना?

मी: सांगता येत नाही पण तुम्ही आलाय हे कळलंय तर येतील लवकर.

पालक: कसलं काय हे प्राध्यापक लोक आकडु असतात, मुद्दाम वाट पाहायला लावतात.

मी: अहो तसं काही नाही, हे प्राध्यापक खूप समजूतदार आणि विद्यार्थ्यांना मदत करणारे आहेत. तो पीएचडी करत असलेला विद्यार्थी कुठेतरी अडकलाय म्हणून त्याच्याशी ते बोलायला गेले आहेत.

पालक: आम्हाला काय माहित नाही काय? हे प्राध्यापक लोक काहीच मदत करत नाही आणि विद्यार्थ्यांची वाट लावतात, आम्ही बघितलंय थ्री इडियट्स मध्ये. मुद्दाम पेपर काय अवघड काढतात, कमी मार्क काय देतात, अपमान काय करतात, मुलांचं आयुष्य बरबाद करून टाकतात. या असल्या लोकांमुळेच देशाची प्रगती होत नाही.

मी: अहो पण तुम्ही समजताय तस काही नाहीये, तुम्ही एकदा भेटा त्यांना मग तुमच्या लक्षात येईल.

तरीही पुन्हा यथेच्छ तोंडसुख घेऊन त्यांनी आपलं नाक मुरडलं. तेवढ्यात प्राध्यापक तिथं आले आणि त्यांना म्हणाले "माफ करा तुम्हाला वाट पाहायला लावली". ते दोघे मग बोलता बोलता प्राध्यापकाच्या खोलीत निघून गेले. १५ ते २० मिनिटात ते पालक पुन्हा लॅब मध्ये आले आणि म्हणाले, "खरंच चांगला माणूस आहे, माझं काम सोपं केल त्यांनी".

ते पालक निघून गेल्यावर मात्र मी विचार करू लागलो कि खरंच या चित्रपटात दाखवलेली शिक्षकाची प्रतिमा किती घातक आहे. नकळत मनोरंजनाच्या गोंडस नावाखाली किती चुकीची माहिती हा चित्रपट समाजात पोचवतोय. सर्वच शिक्षक चांगले किंवा सर्वच वाईट नसतात. मात्र त्या चित्रपटात शिक्षकांची एकही चांगली बाजू अधोरेखित केली गेलेली नाही याच मला आश्चर्य वाटलं. या विषयाबद्दल मला वाटणारे काही मुद्दे मी खाली मांडतो.

१. कोणत्याही देशात प्रसिद्ध संस्थेतील सर्वात हुशार विद्यार्थ्याला भेटा आणि विचारा तुला संस्थेतला एकतरी प्राध्यापक चांगला वाटतो का? तर ते उत्तर "नाही" असं मुळीच नसत.

२. ज्याअर्थी एखादी संस्था देशात प्रसिद्ध असते त्याअर्थी तिथे असणारे सर्व शिक्षक त्रास देणारे आणि टुकार कधीच नसतात.

३. अशा प्रसिद्ध संस्थेत कितीही मोठ्या पदाच्या व्यक्तीबद्दल तक्रार करायला पूर्ण मुभा असते.

४. अशा संस्थात विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उडवून न लावता त्याचे समाधान करण्याचा प्राध्यापक पूर्णपणे प्रयत्न करतो.

५. मार्क भरपूर मिळत नसलेला पण खटपट्या विद्यार्थीही शिक्षकांना आवडतो.

यात भरपूर मुद्द्यांची भर घालता येईल.

या अशा काही कारणामुळे मला हा चित्रपट आवडत नाही. चुकून कधी तो पुन्हा बघायचा योग आलाच तर त्या पालकाबरोबर माझं झालेलं संभाषण आठवतं आणि त्यातील उणीवा आणखी प्रखरतेने समोर येतात. कोणत्याही क्षेत्रातील चांगल शिक्षण हे एका मेहनती शिक्षकाविना किती अवघड आहे याची जाणीव होते. ज्याला एखादा शिक्षक आवडतो किंवा आवडायचा त्यांना या चित्रपटाने नक्कीच विचार करायला भाग पाडले असणार. दुसरीकडे हा चित्रपट विद्यार्थ्यांसाठी "must watch" म्हणून सांगणारे लोक पहिले कि मला त्याच आश्चर्य आणि वाईटही वाटतं.

धन्यवाद.

                                                                                                                                       ---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने