घराबाहेर पडलो कि . . . .

एकदा घरापासून लांब राहील कि आपल्याला घराची आठवण येतेच पण ज्यासाठी आपण बाहेर पडलो ती जबाबदारी सुद्धा मनात घर करून असते. काही दिवसांनी आपण आपल्या कामात आणि नव्या जागेत रुळू लागतो आणि आपलं एक नवीन जग तयार व्हायला सुरुवात होते. हे जग म्हणेज आपला मित्रपरिवार, शिक्षणसंस्था/नोकरीचे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर यांनी बनलेल असतं. घरापासून लांब राहिल्याने एक मोठा बदल निर्माण होतो. तो म्हणजे आपण दोन चेहरे घेऊन वावरायला लागतो. एक चेहरा आपल्या जमिनीशी नाळ सांगणारा आणि दुसरा आपल्या व्यावहारिक जीवनातला.


 

आपण घर सोडलं त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांची आपल्या मनात एक वेगळी छाप पडलेली असते. परंतु आपण घरी नसताना या माणसांमध्ये पण विलक्षण बदल झालेले असतात हे आपण साफ विसरून जातो आणि जुन्या संदर्भाने सर्व पाहतो. मग आपण अधून मधून घरी आलो कि लोकांबरोबर जुन्या पद्धतीने वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जिथं ते नातं सोडलं तिथून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो पण ते सर्व आपल्यासारखे पुढे निघून गेलेले असतात हे आपण समजून घेत नाही. ह्याच कारणाने आपण पुढे गेलो असलो तरी घराकडील माणसांसाठी एक वेगळा चेहरा धारण करतो कि जेणेकरून मी आहे तसाच आहे असं भासावं आणि मी त्यांना परत त्यांच्यातलाच वाटावा.

परंतु व्यवहारात म्हणजे घरापासून लांब राहतो तिकडे आपण दुसरा चेहरा धारण करतो जो कि समंजस, चौकस आणि जबाबदारीपूर्ण असतो. इकडे सर्व निर्णय आपल्याला घ्यायचे असतात त्यामुळे खूप विचार करायची सवय लागते. मित्र असतातच पण आपण स्वतः एक माणूस म्हणून खूप बदलून गेलेलो असतो. घरापासून लांब असताना येणाऱ्या अडचणी आपण स्वतःच सोडवतो. आणि एकटे असल्याने अतिविचार करण्याची सवय लागते जी कधी कधी त्रासही देते. आपल्यातला हा बदल आपल्या घराकडे लोक आपण पादाक्रांत केलेल्या गोष्टींवरून हेरतातच असं नाही. कारण आपण आपला व्यावहारिक चेहरा त्यांना कधी दाखवलेलाच नसतो. खरं पाहिलं तर तोच आपला खरा चेहरा असतो.

लांब राहिल्याने कधी कधी आपण घरच्यांच्या अडचणी समजू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या हातून चुका घडतात. त्यामुळे थोडा विचार करून आणि त्यांची बाजू समजून घेऊन पुढे चालण्याचा मार्ग स्वीकारणं योग्य ठरत.

शेवटी काय, आपल्याला घराची ओढ कायम असते आणि व्यवहार गरजेचा असतो त्यामुळे मधल्या मधे अडकल्यासारखे होते. जुन्या आठवणी मनात घर करून राहतात आणि आपला खोटा चेहरा जपून ठेवायला कारणीभूत ठरतात.

धन्यवाद.

---- डॉ. शैनाथ कळमकर

(All Copyrights with The writer. Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof. Not to be shared in quotes, or paragraphs. If shared online, must be shared in totality.)

 

Comments

Popular posts from this blog

मला आवडलेला चित्रपट : डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो (Dr. Prakash Baba Amte- The real Hero)

दादा कोंडके - "एकटा जीव" पुस्तकानुभव

"कट्यार काळजात घुसली" च्या निमीत्ताने